Pune News : चऱ्होली बुद्रुक-चऱ्होली खुर्द यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे प्रचंड हाल

पिंपरी चिंचवड वड महानगरपालिका हद्दीतील चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द यांना जोडणारा रस्ता तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातून विकसित करण्यात आला. मात्र रस्त्याच्या रुंदीप्रमाणे विकास कामे झाली नाहीत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरून रहदारी करणे दुर्गंधीयुक्त आणि धोक्याचे झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या बाह्यवळण मार्गावर शालेय बसला अपघात झाला होता. मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही.

चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द यांना जोडणारा रस्ता सध्या वादाचा मुद्दा ठरत आहे. या बाह्यवळण मार्गावर कचरा टाकण्यात येत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा बाह्यवळण मार्ग तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखाड्यातून विकसीत करण्यात आला आहे. परंतु पुला जवळ हा मार्ग धोक्याचा झाल्याने बाह्यवळणावरील रस्त्याच्या रुंदीप्रमाणे रस्ता विकसित करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या बाह्यवळणावर झाडे आणि झुडपे वाढल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी याच जागेवर शाळेच्या बसचा अपघात झाला होता. सुदैवाने 70 मुलांचे प्राण चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे वाचले आहेत. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक जाळी बसविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच सदर ठिकणी मोठ्या प्रमाणात कचरा असल्यामुळे स्वच्छता मोहिम राबवून कचरा उचलण्याची मागणी नागरिकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रकरणी तात्काळ पुलाची व रस्त्याची दुरूस्थी करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने तुकाराम महाराज ताजणे यांनी केली आहे. पंचायती तर्फे संरक्षक जाळी बसवण्याचे आणि स्वच्छतेचे काम केले जाईल, असे चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भाऊसाहेब जगदाळे म्हणाले.