अजितदादांच्या अपघातात मोठ्या व्यक्तीचा हात, रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये मोठ्या व्यक्तीचा हात आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. व्हीएसआर कंपनीशी केंद्रीय उड्डाण मंत्र्यांचे व्यावसायिक संबंध असतील तर त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही ते म्हणाले. अपघाताचा तांत्रिक आणि गुन्हेगारी अंगानेही तपास करावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी डीजीसीएविरोधात एफआयर दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर आज रोहित पवार, युगेंद्र पवार हे वकिलांसह बारामती पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र तिथेही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. यानंतर पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी आरोप केले. डीजीसीएने 24 फेब्रुवारीच्या अहवालात व्हीएसआर कंपनीचे दोष दाखविले. तसेच व्हीएसआर कंपनीची पाच विमाने ग्राऊंड करण्यात आली. जर ही विमाने ग्राऊंड करण्यात आली असतील तर अजितदादांना सदोष विमान चुकून दिले की, जाणूनबुजून दिले, याचा तपास करणे आवश्यक आहे. बारामती पोलीस ठाण्यामध्ये करत असलेला एफआयआर हा व्हीएसआर कंपनीविरोधात आहे. तसेच विमानाच्या उड्डाणाला परवानगी ज्या यंत्रणेने दिली, त्या डीजीसीएच्या अधिकाऱ्यांविरोधात आम्ही तक्रार दिली आहे. डीजीसीएमधील कोणत्या अधिकाऱ्यांनी याला परवानगी दिली? असा सवाल त्यांनी केला.

डीजीसीएवरच आमचा आरोप

विमान अपघाताचा तपास करणारी एएआयबी ही संस्था तांत्रिक बाजूने तपास करते. डीजीसीए देखील पुन्हा असे अपघात होऊ नयेत, याची दक्षता घेण्यासाठी तांत्रिक बाबींचा तपास करते. पण डीजीसीएचे अधिकारीच अपघाताला जबाबदार असल्याचा आमचा आरोप आहे. डीजीसीएलाच अधिकार दिले तर प्रामाणिक तपास होणार का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.

‘सीआयडी’कडून योग्य पद्धतीने तपास, अपर पोलीस महासंचालकांचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणाचा तपास सीआयडीकडून योग्य पद्धतीने सुरू आहे. हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे वर्ग करावा, यासंदर्भात पत्रव्यवहार केला असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत आमच्याकडून तीन मुद्द्यांवर तपास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

रामानंद म्हणाले, ‘अपघातामध्ये कोणता घातपात आहे का, गुन्हेगारी कृत्य घडले आहे किंवा क्रिमिनल निग्लिजन्स आहे का?, या दृष्टीने सीआयडीमार्फत तपास केला जात आहे. घटनेचा तपास योग्य पद्धतीने करण्यात येत आहे. बारामती कैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक सायन्स लॅब, एव्हिएशन ऑथॉरिटी आणि केंद्रातील तपास यंत्रणा या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करीत आहेत. एअरक्राफ्ट ऑक्सिडेंट इन्केस्टीगेशन ब्युरो (एएआयबी) आणि सीआयडी यांच्यामध्ये समन्वय ठेवून तपासाला गती दिली आहे. एअरक्राफ्ट ऑक्सिडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरोचा निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे सीआयडी पुढील तपास करणार आहे.

दादांच्या मृत्यूचे सत्य बाहेर आणा! विधान परिषदेत विरोधक आक्रमक

अजितदादांच्या मृत्यूचे सत्य बाहेर आणा आणि संशयास्पद मृत्यूबाबत विधान परिषदेत चर्चा घडवून आणा, अशी मागणी आज विरोधकांनी केली. मात्र सभापती राम शिंदे यांनी या अपघाताची स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे सांगत मागणी फेटाळली. त्यामुळे विरोधकांनी जोरदार निषेध केला. त्यामुळे अल्पकालीन चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन सभापतींनी दिले. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर एव्हिएशन कंपनीविरोधात एफआयआर दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. विधान परिषदेत गुरुवारी याचे तीव्र पडसाद उमटले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या मृत्यूबाबत सत्यता समोर यावी, यादृष्टीने चौकशी व्हावी याकरिता प्रश्नोत्तराच्या तासानंतर आमदार शिंदे यांनी 93 अन्वये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. संबंधित कंपनीला केवळ विमानबंदी पुरेशी नाही तर जबाबदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या प्रकरणात सदोष मनुष्यवध, गुन्हेगारी कटाच्या आरोपांखाली एफआयआर नोंदवावा, अशी भूमिका मांडली.