
कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्याविरुद्ध तिसऱ्यांदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. महिला व्यावसायिकाला धमकावून त्याने 45 लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर घायवळविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे 11 गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या तीन गुह्यांत त्याच्यासह टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केलेल्या गुंड नीलेश घायवळ याच्याविरुद्ध कोथरूड गोळीबार, बांधकाम व्यावसायिकाला धमकावून फ्लॅटचा ताबा घेणे, महिला व्यावसायिकाला खंडणी उकळल्या प्रकरणी दाखल गुह्यात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. घायवळविरुद्ध मोक्कानुसार 3 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच घायवळच्या संपत्तीबाबत पुणे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. त्याच्या संपत्तीची चौकशी करण्याबाबत पुणे पोलिसांकडून अंमलबजावणी संचालनालयाशी (ईडी) पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
ब्रिटन उच्चायुक्तांशी पोलिसांचा पत्रव्यवहार
गुंड नीलेश घायवळ सध्या लंडनमध्ये राहायला असून बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून तो परदेशात गेला आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांनी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान घायवळ टोळीने धाराशीव, अहिल्यानगर, बीड, सातारा, पुणे जिह्यात दहशत निर्माण केली आहे. जमीन बळकावण्याचे गुन्हे करीत बेकायदा मार्गाने त्याने संपत्ती जमा केली आहे. त्याच्या संपत्तीची तपासणी करण्यात यावी, असे पत्र पुणे पोलिसांनी नुकतेच ईडीला पाठविले आहे.
कोथरूडमधील 10 फ्लॅटचा घेतला बेकायदेशीर ताबा
कोथरूडमध्ये एका इमारतीतील 10 फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेत घायवळ टोळीने भाडेकरू ठेवले होते. सचिन घायवळ, नीलेश घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या महिलेला धमकावून खंडणी उकळल्या प्रकरणी घायवळ याच्यासह त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला.




























































