जलाशय परिचलन तक्त्यानुसार आज दुपारी 3 वाजता धरणाच्या 11 मोऱया 3 इंच उंचावून 2 हजार क्युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या शेतकऱयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सन 2022 साली 15 ऑगस्टला मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. मागील वर्षी संभाव्य पूरपरिस्थितीत पाणी सोडण्याची ही परंपरा खंडित झाली होती. दरम्यान, समन्वयी पाणीवाटप धोरणानुसार 30 नोव्हेंबर 2023 रोजी मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडावे लागले होते. सोमवारी सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा 22 हजार 779 दशलक्ष घनफूट (87.61 टक्के) झाल्याने परिचलन तक्त्यानुसार धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी जाहीर केला.
आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुळा धरणाच्या पाणीसाठय़ाची 22 हजार 833 दशलक्ष घनफूट, तर पाणी पातळीची 1706.35 फूट नोंद झाली होती. सोमवारी दुपारी 3 वाजता कोतूळकडून मुळा धरणात 1753 क्युसेकने, तर सायंकाळी 6 वाजता 2253 क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती.
यावर्षी 3 जून ते 11 ऑगस्ट या कालावधीत कोतूळकडून मुळा धरणात 16 हजार 852 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. सोमवारी दुपारी नदीपात्रात पाणी सोडण्यापूर्वी सकाळच्या वेळेत नदीकाठच्या लोकांना भोंग्याद्वारे सावधानतेचा इशारा देण्यात आला. यावेळी मुळा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाधिकारी राजेंद्र पारखे, सलीम शेख, सुनील हरिश्चंद्रे, आय्युब शेख, दिलीप कुलकर्णी, वैशाली साळवे, प्रिया कचरे उपस्थित होते.