कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, आई शिवानी अगरवाल यांनी मुलाच्या रस्काचा नमुना नष्ट केल्याचा संशय आहे. हा रक्ताचा नमुना त्यांनी कुठे आणि कसा?, कोणाच्या सांगण्यावरून नष्ट केला. तसेच, अशपाक याने कोणाच्या सांगण्यावरून अगरवाल यांना मदत केली, याचा तपास करायचा आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी न्यायालयात दिली. न्यायालयाने अगरवाल दांपत्यासह अशपाक याच्या पोलीस कोठडीत 14 जूनपर्यंत वाढ केली.
अल्पवयीन मुलाचे वडील, बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, आई शिवानी अगरवाल, अशपाक मकानदार यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज (दि. 10) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांनी पोलीस कोठडीत वाढ करण्याचा आदेश दिला.
विशाल, शिवानी यांनी रक्ताच्या नमुन्यांची कोठे विल्हेवाट लावली याची माहिती दिलेली नाही. मकानदार याने घटनेच्या दिवशी वेगवेगळय़ा लोकांच्या भेटी घेतल्या असून, त्याबाबत चौकशी करायची आहे. मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी 4 लाख रुपये देण्यात आले असून, त्यातील 3 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. अद्याप 1 लाख रुपये हस्तगत करायचे आहेत, अशी माहिती गोवेकर यांनी दिली. सरकारी वकील अनिल पुंभार यांनी युक्तीवाद करताना, आरोपींच्या हस्ताक्षरांचे, सह्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. ससून रुग्णालयातील वॉर्ड चाळीस मधील रजिस्ट्रर जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेले साहित्य तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे.