
स्वारगेट एसटी आगारातील ‘निर्भया’ कांड प्रकरणातील आरोपी नराधम दत्तात्रय गाडे (35) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. बलात्कारानंतर आरोपी एसटीने आपल्या गुणाट (ता. शिरूर) या गावी गेल्याचे उघड झाले आहे. तो गावातील उसाच्या फडात लपल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस उसाचे फड धुंडाळत असून ड्रोनद्वारे सर्च ऑपरेशन राबविले जात आहे.
गाडे गावातून मालवाहू टेंपोतून स्वारगेटला आला. त्याने आगारात बसलेल्या तरुणीसोबत गप्पा मारून तिला फसवले. शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तो एसटीने गुणाटला गेला. घरी गेल्यानंतर त्याने कपडे, बूट बदलून पलायन केले. दरम्यान बसची आज न्यायवैद्यकीय तज्ञांकडून तपासणी करण्यात आली.
कोल्हापुरात बंदुकीच्या धाकाने बलात्कार
कोल्हापूरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेतील नराधमाने शरीरसंबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार बलात्कार केला. हा आरोपी कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहतीमधील असून विश्वजीत पाटील असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखाचे बक्षीस
दत्तात्रय गाडे याचा फोटो पोलिसांनी प्रसिद्धीला दिला आहे. त्याची माहिती देणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे.
शोधासाठी ड्रोन
स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार गाडे गुणाट येथील उसाच्या शेतात लपल्याची शक्यता आहे. उसाच्या रानात शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात आली आहे. पोलिसांची 13 पथके आरोपीचा शोध घेत आहेत. गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरीचे 6 गुन्हे दाखल आहेत.
आई – वडील, मैत्रिणीची चौकशी
पोलिसांनी आरोपीचे आई-वडील, भावाकडे चौकशी सुरू केली आहे. आरोपीची मैत्रीण भोर तालुक्यात राहायला असून तिच्याकडेही चौकशी केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठवून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. पुणे पोलिसांनी तपास अहवाल, फिर्यादीची प्रत तीन दिवसांत सादर करावी, असे निर्देश दिले.
अजित पवार गटाच्या आमदारासोबत फोटो
दत्तात्रय गाडे याने शिरूर हवेली मतदार संघातील अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासोबत असलेला फोटो व्हॉट्सअप डीपीला ठेवला होता. तसेच आमदार कटके यांच्या बॅनरवरदेखील त्याचा फोटो असल्याचे समोर आले आहे. तो अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. त्यावर आमदार कटके यांनी खुलासा करत या आरोपीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.