सायरन का वाजवतोस; सीटबेल्ट कुठंय?, पुणेकराने घेतली मिंधे गटाच्या आमदाराची हजेरी

वाहतूककोंडी असतानाही गर्दीत गाडीचा सायरन वाजवीत जाणाऱ्या मिंधे गटाच्या आमदाराची एका पुणेकराने चांगलीच हजेरी घेतली. गाडीचा सायरन वाजवत प्रवास करत असताना पुणेकर नागरिकाने त्यांना थांबवून चालकावर ‘सायरन का वाजवतोस, सीटबेल्ट कुठंय’ असा प्रश्नांचा भडिमार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे या आमदारांची बोबडीच वळली. दरम्यान, प्रश्नांच्या या भडिमारानंतर चालकाने सीटबेल्ट लावला.

आमदार किशोर दराडे यांची गाडी बाजीराव रोडवरून जात असताना त्यांच्या ड्रायव्हरने सायरन वाजवत गाडी चालवली. दरम्यान, सायरन का वाजत आहे म्हणून एका पुणेकराने पाहिले. गाडीला ‘आमदार’ असे स्टिकर लावले होते. गाडीत त्यांना आमदार दराडे असल्याचे दिसले. त्यानंतर पुणेकराने त्यांची गाडी थांबवून काच खाली घ्यायला लावली. त्यानंतर संबंधित पुणेकराने गाडी चालकाला, सायरन का वाजवतोस? सीटबेल्ट का लावला नाही? असा जाब विचारला. यावेळी आमदार दराडे नागरिकाकडे पाहत राहिले. आम्ही जनता आहोत, आम्ही निवडून देतो तेव्हाच ते आमदार होतात. पोलिसांकडे पाहू नको, असेही या पुणेकराने चालकाला सुनावले.