LPG Shortage – दोन-तीन दिवसांपासून सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न, अखेर एलपीजी गॅसमुळे वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यात अडथळे येत असल्याच्या अफवांदरम्यान, पंजाबमधील बरनाला जिल्ह्यातील सेहना येथे एका दुर्दैवी घटनेची नोंद झाली. घरगुती एलपीजी सिलिंडर मिळवण्यासाठी पहाटेपासून रांगेत उभे असलेले भूषण कुमार मित्तल या वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मित्तल हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत होते. शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते रांगेत उभे होते, मात्र तासन्तास वाट पाहिल्यानंतर थकव्यामुळे ते कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मित्तल यांचा टोकन क्रमांक 25 होता, तर रांगेत 130 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. गॅस एजन्सी उघडण्याच्या काही मिनिटे आधीच ही घटना घडली. या घटनेनंतर प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली असून, पंजाबच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एलपीजीचा काळाबाजार किंवा साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तेल कंपन्यांनी राज्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.