
हिंदुस्थान यावर्षी 26 जानेवारी रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. यासाठी राजधानी दिल्लीत मोठी तयारीही सुरू आहे. 26 जानेवारीच्या दिवशी निघणाऱ्या परेडमध्ये हिंदुस्थान आपली लष्करी ताकद दाखवून देईल. ही तयारी जोरात सुरू असतानाच पंजाब पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. अमृतसर आणि होशियारपूरमध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेत बंदी घातलेल्या ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे अडीच किलो आरडीएक्स, पिस्तूल, जीवंत काडतुसे असा दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे.
पंजाब पोलिसांनी अमृतसह आणि होशियारपूरमध्ये विशेष मोहीम राबवली असून बंदी घातलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेच्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. पोलिसांनी 5 आरोपींना बेड्या ठोकल्या असून या कारवाईमुळे संभाव्य धोका टळल्याचा दावा पोलिसांनी केला.
दरम्यान, दिलजोत सिंह, हरमन सिंह उर्फ हॅरी, अजय उर्फ माहिरा आणि अर्शदीप सिंह उर्फ अर्श कंडोला अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे सर्वजण एसबीएस नगर जिल्ह्यातील राहों भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली.
होशियारपूरमध्ये पोलिसांनी बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या चार हँडलरला अटक केली आहे. हे सर्वजण अमेरिकेतील हँडलर्सच्या माध्यमातून थेट ISI समर्थित दहशतवादी नेटवर्कशी जोडलेले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 2..5 किलो वजनाचे RDX आधारित IED स्फोटकं, दोन पिस्तुलं, काडतुसे असा दारुगोळा जप्त केला आहे. तर दुसऱ्या एका कारवाईत अमृतसह पोलिसांनी एका दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या. हा दहशतवादी एका सुरक्षा आस्थापनेवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक हँड ग्रेनेड, अत्याधुनिक पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत.
दरम्यान, प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, हे मॉड्यूल सीमापार बसलेल्या हँडलर्सच्या संपर्कात होते आणि पंजाबमध्ये शांतता भंग करण्यासाठी मोठ्या स्फोटांच्या तयारीत होते. पोलिसांनी आता राज्यभर शोधमोहीम तीव्र केली असून या नेटवर्कशी संबंधित इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.






























































