जगन्नाथ पुरीच्या रत्नभांडारावर ‘नागांचा’ पहारा! खजिन्याच्या रक्षणासाठी स्नेक हेल्पलाईन सज्ज; काय आहे यामागचं गूढ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिसातील सुप्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिराच्या ‘रत्नभांडारा’तील अमूल्य दागिन्यांची आणि खजिन्याची मोजणी प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. तब्बल 46 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर हे रत्न भांडार उघडण्यात आले. या खजिन्यात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा देवींचे सोन्या-चांदीचे अलंकार, मौल्यवान रत्ने आणि पुरातन नाणी यांचा समावेश आहे. 12 व्या शतकातील या मंदिराला ‘धरतीवरील वैकुंठ’ मानले जाते. बुधवारी दुपारी 12 वाजल्यानंतर शुभ मुहूर्तावर या खजिन्यातील सोने, चांदी, हिरे आणि दागिन्यांची यादी बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. या प्रक्रियेमुळे मंदिराच्या एकूण संपत्तीचा अधिकृत आकडा समोर येणार असल्याने भाविक आणि प्रशासनामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पौराणिक मान्यतेनुसार, या अफाट संपत्तीच्या मालकीण स्वत: धनलक्ष्मी देवी आहे. देवी लक्ष्मीच्या मायावी शक्ती या खजिन्याचे रक्षण करतात असे मानले जाते. ज्याप्रमाणे भगवान विष्णूंकडे शेषनाग आहे, त्याचप्रमाणे लक्ष्मी देवीचे ‘पद्म’ आणि ‘महापद्म’ नावाचे दोन सेवक नाग या खजिन्याचे रक्षक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, प्राचीन काळात ‘पद्म’ आणि ‘महापद्म’ हे शब्द अफाट संपत्ती मोजण्यासाठी देखील वापरले जात असायचे.

या खजिन्याच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ नागांवरच नाही तर, भगवान शिवशंकरांच्या ‘लोकनाथ’ रूपावरही आहे. जगन्नाथ मंदिरापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर लोकनाथ महादेवाचे मंदिर आहे. अख्यायिकेनुसार, वनवासादरम्यान प्रभू रामाने या शिवलिंगाची स्थापना केली होती. हे लोकनाथ देवच या रत्नभांडाराचे मुख्य रक्षक मानले जातात. म्हणूनच, खजिन्याची मोजणी करण्यापूर्वी परंपरेनुसार लोकनाथ देवाचा आशीर्वाद आणि अनुमती घेण्याची प्रथा आहे.

रत्नभांडारात सापांचा वावर असल्याच्या अनेक चर्चा वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्यामुळेच यंदा एसओपीनुसार मोजणी प्रक्रिया सुरू करताना प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. कोणत्याही आपत्कालीन स्थितीसाठी घटनास्थळी ‘स्नेक हेल्पलाईन’चे सर्पमित्र तैनात करण्यात आले आहेत. धार्मिक विधी आणि आधुनिक सुरक्षा व्यवस्था यांच्या मेळातून या ऐतिहासिक खजिन्याची मोजणी केली जात असून त्यातून किती संपत्ती समोर येते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.