रेल्वेबाबत स्टंटबाजी न करता पाठपुरावा करा; संगमनेर रेल्वे कृती समितीची मागणी

संगमनेर, अकोले परिसराच्या औद्योगिक आणि व्यापारवृद्धीबरोबरच तरुणांच्या नोकरी—व्यवसायासाठी महत्त्वाच्या ठरणाऱया नाशिक-पुणे रेल्वेसाठी उभारण्यात आलेल्या लोकचळवळीमध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी सहभाग घ्यावा, फक्त फोटोसाठी स्टंटबाजी करू नये, असे आवाहन रेल्वे कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. संगमनेर शहर व पुण्यापर्यंत संगमनेर रेल्वे मार्गाचे हार्ंडग उभारण्यात आले असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नाशिक-पुणे रेल्वेसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी शिर्डीमार्गे ही रेल्वे नेली असून, याला विरोध करणे गरजेचे आहे. याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी मोठी जनचळवळ उभारली असून, यामध्ये संगमनेरच्या लोकप्रतिनिधी यांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संगमनेर रेल्वे कृती समितीच्या वतीने नाशिक ते पुणे महामार्गावर रेल्वे महामार्गाचे होर्डिंग उभारण्यात आले असून, यामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संगमनेरच्या नवीन लोकप्रतिनिधींनी नागपूर अधिवेशनामध्ये हातात फलक घेऊन स्टंटबाजी केली खरी; आता त्यांनी संगमनेरच्या रेल्वेसाठी जन आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक-पुणे रेल्वेसाठी मोठी लोकचळवळ उभारली. ऑनलाइन कॅम्पियनबरोबर सह्यांची मोहीम संगमनेरमध्ये सुरू झाली आहे. यामध्ये सर्वपक्षीय नागरिक सहभागी आहेत.

सत्ताधारी लोकप्रतिनिधींची फोटोसाठी स्टंटबाजी

संगमनेरच्या दळणवळण आणि व्यापार वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली रेल्वे ही विद्यमान सत्ताधारी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी शिर्डीमार्गे वळवली, याला संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला पाहिजे किंबहुना राजीनामा देण्याची तयारी दाखवली पाहिजे. मात्र, असे न करता फक्त फोटोसाठी स्टंटबाजी आणि काम न करता, फ्लेक्सबाजी हे त्यांचे वैशिष्टय़ असून, आंदोलनामध्ये सहभागी व्हा, मुख्यमंत्र्यांसमोर आवाज उठवा, राजीनामा द्या, असे आवाहन संगमनेर रेल्वे कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.