Pushpa 2 – पुष्पा चित्रपटाच्या पुढील भागाच्या चित्रीकरणाला ऑक्टोबरपासून सुरुवात

pushpa-2

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली होती. हा चित्रपट दोन भागात असून दुसऱ्या भागाची मोठी उत्कंठा निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होईल असे सांगितले जात आहे. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाने तेलुगू प्रेक्षकांचीच नाही तर हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांचीही मने जिंकली होती. चित्रपटाच्या एकट्या हिंदी आवृत्तीने 100 कोटींचा गल्ला जमवला होता.

चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत दिग्दर्शक सुकुमार यांनी कोणतीही माहिती बाहेर फुटणार नाही याची काळजी घेतली आहे. दुसऱ्या भागाची कथा लिहून पूर्ण झाली असून पटकथाही तयार झाली आहे. दुसऱ्या भागात अभिनेता मनोज बाजपेयी दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र मनोज बाजपेयी याने या अफवा असल्याचं म्हटत या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणं अपेक्षित आहे. या चित्रपटाचे डिजिटल हक्क मिळावेत यासाठी अमेझॉन प्राईम, डिस्ने प्लस हॉटस्टार यांच्यात स्पर्धा आहे.