सिंधूचे विजयी अभियान सुरू,वर्ल्ड टूर फायनल्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चीन

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या हिंदुस्थानच्या पीव्ही सिंधूने विजयाने वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अभियानास प्रारंभ केला. सहाव्या मानांकित सिंधूने ग्रुप ‘ए’मधील सलामीच्या लढतीत द्वितीय मानांकित व विद्यमान चॅम्पियन असलेल्या जपानच्या अकाने यामागुची हिचा सरळ गेममध्ये पराभव केला.

दुबईत गतवेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या सिंधूने दोन्ही गेममध्ये सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतरही संयम आणि आक्रमता यांचा सुरेख ताळमेळ राखत यामागुचीला 52 मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत 24-22, 21-15 असे पराभूत केले. या स्पर्धेत तिसऱ्यांदा सहभागी झालेल्या सिंधूची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. अनेकदा ती पिछाडीवरही पडली, मात्र जिद्दीने खेळत तिने बाजी मारली.

पहिल्या गेममध्ये 6-11 असे पिछाडीवर पडल्यानंतर सिंधूने जपानी प्रतिस्पर्धीला अखेरच्या टप्प्यात 19-19 असे गाठले. शेवटी मानसिक लढाईत सिंधू सरस ठरली व 27 मिनिटांपर्यंत चाललेला पहिला गेम तिने जिंकला. दुसऱया गेममध्ये बॅडहॅण्डच्या फटक्यांनी यामागूचीने सिंधूवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, मात्र 3-1 असे आघाडीवरून सिंधू पुन्हा 3-6 अशी पिछाडीवर पडली. यामागुची 11-10 अशी आाघाडीवर असताना हिंदुस्थानी खेळाडूने जबरदस्त पुनरागमन करून सलग सहा गुणांची कमाई करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.

समीर वर्मा सलामीलाच गारद
पुरुष एकेरीत हिंदुस्थानच्या समीर वर्माला सलामीच्या लढतीतच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्याला जपानच्या कंतो मोमोता याने 21-18, 21-6 असे हरविले. समीरने पहिल्या गेममध्ये तुल्यबळ लढत दिली, मात्र दुसऱ्या गेममध्ये सपशेल शरणागती पत्करल्याने समीरचा पराभव झाला.