
इस्रायल-अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. इराणने आखाती देशातील अमेरिकेच्या आठ तळांना लक्ष्य केले. सौदी अरब, कतार, कुवेत, बहरीन, अबुधाबी, दुबई, इराक आणि जॉर्डन येथे इराणने हवाई हल्ले केले. कतारचा अल उदैद हवाई तळ, कुवेतमधील अल सालेम हवाई तळ, यूएईचा अल धाफरा आणि बहरीनमधील यूएस फिफ्थ फ्लीट तळ इराणने उडवला. या युद्धामुळे जगभरात खळबळ उडाली असून वेगवेगळ्या विमानतळावर हजारो लोक अडकले आहेत. याचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून हिंदुस्थानची स्टार बॅटमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूही दुबई विमानतळावर अडकली आहे. परिस्थिती अधिकच भीतीदायक होत चालल्याचे म्हणत तिने भयानक अनुभव शेअर केला आहे.
पी. व्ही. सिंधू ही बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ‘ऑल इंग्लंड ओपन’साठी निघाली होती. सिंधू दुबईत कनेक्टिंग फ्लाईटच्या प्रतीक्षेत असतानाच इस्रायल-अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आखाती देशातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले. यावेळी यूएईवरही इराणने क्षेपणास्त्र डागली. इराणची क्षेपणास्त्र यूएईने हवेत नष्ट केली, मात्र यामुळे विमानांची उड्डाणे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. दरम्यान, दुबई विमानतळावर हजारो कुटुंबे अडकली आहेत आणि परिस्थिती अतिशय भयावह आहे, अशी व्यथा सिंधूने मांडली.
The ordeal continues to unfold, and the situation is becoming more frightening by the hour.
A few hours ago, there was an explosion close to where we were holed up at the airport. My coach had to quickly run out of the area as he was closest to the smoke and debris. It was an… https://t.co/ZdNtuALk0P
— Pvsindhu (@Pvsindhu1) March 1, 2026
परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि प्रत्येक क्षणागणिक भीती वाढत चालली आहे. काही तासांपूर्वी आम्ही विमानतळावर ज्या ठिकाणी थांबलो होतो, त्याच्या अगदी जवळ एक स्फोट झाला. माझे प्रशिक्षक धूर आणि ढिगाऱ्याच्या सर्वात जवळ असल्याने त्यांना तिथून तातडीने बाहेर पळावे लागले. तो आम्हा सर्वांसाठी अत्यंत तणावाचा आणि भीतीचा क्षण होता, असे सिंधूने म्हटले.
आम्ही सर्वजण आता सुरक्षित आहोत आणि आम्हाला अधिक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दुबई विमानतळावरील कर्मचारी आणि दुबई प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले, त्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच, दुबईतील हिंदुस्थानी उच्चायुक्तांचेही विशेष आभार, ज्यांनी आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी मोलाचे सहकार्य आणि सतत मदत केली. सध्या आम्ही थोडा आराम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि परिस्थिती शांत होण्याची प्रतीक्षा करत आहोत, असेही ती म्हणाली.






















































