
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठी-हिंदी भाषेवरुन वाद सुरू आहे. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीनंतर हा वाद चांगलाच रंगला आहे. हिंदी सक्तीबद्दल मराठी सिनेसृष्टीतील काही दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
मराठी कलाकारांसोबतच अनेक बॉलीवूड कलाकारांनीसुद्धा हिंदी-मराठी भाषेच्या मुद्द्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अभिनेता आर. माधवननेही यावर त्याचं मत व्यक्त केलं आहे. नुकत्याच आयएनएसला दिलेल्या मुलाखतीत त्याला भाषेमुळे कधी कोणती अडचण आली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्या मुलाखतीत आर. माधवन म्हणाला, “मी तामिळ भाषिक आहे; पण मला हिंदी भाषा उत्तम येते. मी जमशेदपूरमध्ये मोठा झालो आहे, तिथे हिंदीच बोलली जायची. त्यानंतर मी कोल्हापूरमध्ये राहिलो, तिथे मी मराठी शिकलो. त्यामुळे भाषेची अडचण कधीच वाटली नाही. जिथे मी राहिलो; तिथली भाषा मी शिकलो. त्यामुळे मला कधीही संवाद साधायला अडचण झाली नाही”, असे आर माधवन याने सांगितले.