महालक्ष्मी येथील रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आल्यामुळे या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून न्यूयॉर्कच्या धर्तीवर मुंबई सेंट्रल पार्क होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी आता हिरवळीसह चालण्यासाठी, बसण्यासाठी जागा, प्ले ग्राऊंड, आर्ट कल्चर, चिल्ड्रन पार्प आणि नागरिकांसाठी उद्यान स्वरूपात सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. मात्र या ठिकाणी कोणतेही बांधकाम होणार नसले तरी 120 एकर जागेच्या वापर आता नव्या कारणासाठी होणार असल्याने पालिकेने आरक्षण बदलाबाबत आज हरकती-सूचना मागवल्या आहेत.
मुंबई महानगरपालिका रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम न करता अद्ययावत सुविधा असणारे भव्य मुंबई सेंट्रल पार्क तयार करणार आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडून 120 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आल्यामुळे आता सेंट्रल पार्कचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये रेसकोर्सची 120 एकर आणि कोस्टल रोडची सुमारे 180 एकर जागा मिळून एपूण 300 एकर जागेवर संपूर्ण हिरवळीसह, चालण्यासाठी आणि बसण्यासाठी जागा आदी सुविधा तयार करण्यात येतील. मात्र रेसकोर्सच्या 120 एकर जागेवर असलेले आरक्षण बदलणार असल्याने हरकती-सूचना मागवल्या असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
22 सप्टेंबरपर्यंत हरकती-सूचना दाखल करा
मुंबईकरांना याबाबत 22 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना पालिकेकडे दाखल करता येणार आहेत. पालिका मुख्यालयातील प्रमुख अभियंता, पाचवा मजला, अॅनेक्स बिल्डिंग, पर्ह्ट येथे दाखल करू शकणार आहेत. या हरकती-सूचनांवर पालिका नंतर सुनावणी घेणार आहे. या हरकती-सूचनांबाबतच्या सुनावणीनंतर पालिका आरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करणार आहे. यामध्ये हरकती-सूचनांनुसार काही बदलही केले जाऊ शकतात. यानंतर अंतिम आराखडा राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.