व्यापार हत्यार बनलं असून हा हिंदुस्थानसाठी वेकअप कॉल! RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा सरकारला इशारा

अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे हिंदुस्थानवर मोठा आर्थिक बोझा पडणार आहे. याचा विविध क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. याबाबत आता ‘रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया’चे माजी गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी मोठे विधान केले आहे. जागतिक पातळीवर व्यापाराला हत्यार बनवले जात असून हिंदुस्थानसाठी हा वेकअप कॉल असल्याचे रघुराम राजन म्हणाले. हिंदुस्थानने एका व्यापारिक भागीदारावरील अवलंबवित्व कमी केले नाही तर अशा अडचणी येतच राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.

रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने हिंदुस्थानवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. यामुळे हिंदुस्थानातून निर्यात होणाऱ्या वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लागू झाला असून याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. याबाबत बोलताना रघुराम राजन म्हणाले की, जागतिक पातळीवर व्यापार, गुंतवणूक आणि वित्त याचा हत्यार म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे हिंदुस्थानने काळजीपूर्वक पावले उचलायला हवीत. हा वेकअप कॉल असून आपण एका देशावर अवलंबून राहू नये. पूर्वेकडील देश, युरोप आणि आफ्रिकेकडे मोर्चा वळवावा. योग्य उपाययोजना केल्यामुळे आपल्याला 8 ते 8.5 टक्के विकासदर साधून रोजगार निर्मिती करता येईल.

ते पुढे म्हणाले की, अमेरिकेसोबत व्यापार सुरू ठेवणे आवश्यक असून रशियाकडून तेल खरेदीच्या निर्णयाचेही पुनर्मूल्यांकन करावे लागेल. आपल्याला हा विचार करावा लागेल की, यामुळे फायदा होतोय की नुकसान. एका बाजुला रशियाकडून घेतलेले तेल रिफाईन करून नफा कमवत आहोत, तर दुसर्‍या बाजुला निर्यातदार टॅरिफच्या माध्यमातून जास्त शुल्क भरत आहेत. त्यामुळे याचा विचार करणे योग्य ठरेल.

हे मोदींचं युद्ध आहे! रशिया-युक्रेन संघर्षाचा हिंदुस्थानशी संबंध जोडत व्हाईट हाऊसच्या सल्लागारांचं मोठं विधान

आपण एकावर अवलंबून न राहता पर्याय शोधावे. या संकटाला संधी म्हणून पहावे. चीन, जपान, अमेरिका किंव इतर कुठल्याही देशासोबत काम करा, पण त्यांच्यावर अवलंबून राहू नका. पर्याय शोधा, शक्य तितके आत्मनिर्भरतेवर भर द्या, असे राजन म्हणाले.

अमेरिकेच्या टॅरिफमुळे माशांची शेती करणारे शेतकरी, कापड उत्पादक, लहान निर्यातदार यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा लोकांची उपजीविका धोक्यात येईल. अर्थात यामुळे अमेरिकन ग्राहकांनाही खिसा मोकळा करावा लागेल. कारण 50 टक्के टॅरिफमुळे त्यांना जास्त पैसे मोजून वस्तू खरेदी कराव्या लागतील, असेही ते म्हणाले.