
भाजपसाठी निवडणूक आयोग जनतेच्या मतांची चोरी करत आहे. मी शंभर टक्के पुराव्यांसह बोलत असून लवकरच निवडणूक आयोगाविरुद्ध पुराव्यांचा अॅटमबॉम्ब फोडणार, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला.
संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. मी अनेक वेळा म्हटले आहे की, मते चोरीला जात आहेत. आम्हाला मध्य प्रदेश विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शंका होत्या. महाराष्ट्र निवडणुकीत आमच्या शंका आणखी वाढल्या. यानंतर आम्ही आमची चौकशी सुरू केली. त्याला सहा महिने लागले. त्यात आम्हाला जे सापडले आहे तो अॅटमबॉम्ब आहे. त्याचा जेव्हा स्पह्ट होईल तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोग कुठेही दिसणार नाही असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
मतचोरीविरुद्ध 4 ऑगस्टला कर्नाटकात निदर्शने
निवडणूक आयोगाच्या भूमिका आणि कार्यपद्धतीविषयी राहुल गांधी सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. कर्नाटकातील एका एका जागेची चौकशी करताना मोठय़ा प्रमाणात अनियमितता आढळली. प्रत्येक जागेवर निवडणूक आयोगाने हाच प्रकार करून मतचोरी केल्याची दाट शक्यता आहे. याविरुद्ध 4 ऑगस्टला कर्नाटकात बंगळुरूमध्ये कॉँग्रेसकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. यामध्ये राहुल गांधी सहभागी होण्याची शक्यता आहे.
भाजपसोबत निवडणूक आयोग ‘मतांच्या चोरी’मध्ये सामील, आमच्याकडे 100 टक्के पुरावा! राहुल गांधी यांचा दावा pic.twitter.com/RsCTD1ZTF6
— Saamana Online (@SaamanaOnline) August 1, 2025
हा तर देशद्रोह
मी खूप गंभीरपणे सांगतोय की, निवडणूक आयोगात बसून जो कोणी हे मतांच्या चोरीचे काम करत आहे, त्याला आम्ही सोडणार नाही. तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात. हा तर देशद्रोह आहे. तुम्ही कुठेही असाल, जरी तुम्ही निवृत्त झालात तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू, असा इशारा राहुल गांधी यांनी भाजपसाठी काम करणाऱया अधिकाऱयांना दिला.