
हिंदुस्थान आणि अमेरिकेतील व्यापारी कराराच्या नावाखाली देशातील शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. हा मुद्दा देशाच्या भविष्यासोबत जुळलेला असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच प्रश्न विचारले आहेत.
राहुल गांधी यांनी व्यापारी कराराचा मुद्दा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सातत्याने लावून धरला होता. माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा पिंवा हक्कभंग आणा. शेतकऱ्यांसाठी मी लढणारच असे म्हणत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या हितांसाठी सरकारविरोधात दंड थोपटले. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी काही शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती. याच प्रश्नावरून त्यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट टाकून मोदी यांना पाच प्रश्न केले आहेत. हा आजचाच नव्हे तर भविष्याचा प्रश्न आहे. हिंदुस्थानच्या कृषी क्षेत्रावर दुसऱ्या देशाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी देत आहोत का, असे राहुल गांधी यांनी विचारले आहे.
अमित शहा यांनी दिले उत्तर
राहुल गांधी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले. राहुल गांधी हे अमेरिका, ब्रिटन तसेच युरोपियन महासंघासोबत झालेल्या व्यापारी करारावरून असत्य पसरवित असल्याचा आरोप शहा यांनी केला. ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून हिंदुस्थानने 2014 पासून अशा कोणत्याही नियमांना मंजुरी दिली नाही. प्रत्येक करारात कृषी आणि डेअरी क्षेत्राचे हित सुरक्षित ठेवल्याचे अमित शहा म्हणाले.
पंतप्रधान मोदींना विचारलेले पाच प्रश्न
n ड्राईड डिस्टिलर्स ग्रेन्स (डीडीजी) आयात करण्याचा अर्थ काय? आपल्या पशुधनाला अमेरिकेतील जीएम मक्यापासून बनलेला डिस्टिलर चारा खाऊ घालणार का? यामुळे आपली डेअरी उत्पादने अमेरिकेच्या कृषी उद्योगावर अवलंबून असतील का?
n आपण जीएम सोयाबीन तेलाच्या आयातीला परवानगी दिल्यास महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान व इतर राज्यांतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे काय होणार? किमती पडल्यास ते हा फटका कसा सहन करणार?
n तुम्ही अतिरिक्त उत्पादन म्हणता तर, त्यात काय काय समाविष्ट आहे? हा कालांतराने डाळ व इतर पिकांची अमेरिकेतून आयात करण्यासाठी दबाव असल्याचा संकेत आहे का?
n गैर-व्यापार अडचणी हटवण्याचा अर्थ काय? भविष्यात हिंदुस्थानवर जीएम पिकांबाबत आपले धोरण दुबळे करणे, खरेदी कमी करणे किंवा हमीभाव तसेच बोनस कमी करण्यासाठी दबाव टाकण्यात येईल का?
n एकदा हा दरवाजा उघडल्यास प्रत्येक वर्षी तो आणखी जास्त उघडण्यापासून आपण कसे रोखणार? हे रोखणार की, प्रत्येक वेळी हळूहळू इतर पिकांनाही आपल्या टेबलावर ठेवण्यात येईल?


























































