हिमांता बिस्वा सरमा हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, आसाममधील सभेत राहुल गांधींचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आसाममधील एका जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. “हिमांता बिस्वा सरमा हे केवळ आसामचेच नव्हे, तर संपूर्ण देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत,” असा गंभीर आरोप करत राहुल गांधींनी भाजप सरकारवर निशाणा साधला. आसाममधील जमीन घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राहुल गांधी म्हणाले की, “आसामचे मुख्यमंत्री स्वतःला राज्याचे मुख्यमंत्री न समजता राजा समजतात. त्यांचे संपूर्ण कुटुंब भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आसाममधील हजारो एकर जमीन, पाणी आणि जंगल हे अदानी, अंबानींसारख्या बड्या उद्योगपतींच्या घशात घातले जात आहे. हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरू असून, या जमिनीच्या बदल्यात मिळालेला पैसा निवडणुकीत वापरला जात आहे.”

यावेळी राहुल गांधींनी आसामचे प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचाही उल्लेख केला. “झुबीन गर्ग हे आसामच्या अस्मितेचे प्रतीक आहेत, त्यांनी राज्याच्या बहुसांस्कृतिक ओळखीसाठी लढा दिला. आमचे सरकार आल्यावर आम्ही झुबीन गर्ग यांच्याशी संबंधित प्रकरणांत आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या सांस्कृतिक मुद्द्यांवर न्याय मिळवून देऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना इशारा देताना राहुल गांधी म्हणाले की, “जेव्हा काँग्रेसचे सरकार येईल, तेव्हा हिमांता बिस्वा सरमा यांना त्यांच्या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावा लागेल. आसामची जनता त्यांना तुरुंगात पाठवेल आणि त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही.”