दहशतवादाच्या बळींच्या किंकाळय़ा मोदींना ऐकू येत नाहीत, राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा

एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून देशावर तीन दहशतवादी हल्ले झाले. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी या हल्ल्याबाबत अजूनपर्यंत एक अवाक्षरही काढलेले नाही. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सद्वारे सडकून टीका केली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा संदेशांना उत्तरे देण्यात व्यस्त असणाऱया मोदींना दहशतवादाच्या बळींच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

रियासी, कठुआ आणि डोडा येथे गेल्या तीन दिवसात तीन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या. परंतु, मोदी अजूनही जल्लोषात मग्न आहेत. भाजप सरकारच्या काळात दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारे का पकडले जात नाहीत, याचे उत्तर देश मागत आहे, असे आपल्या पोस्टमध्ये नमूद करत राहुल यांनी हल्ला चढवला. शुभेच्छा संदेशांना रिप्लाय देण्यात व्यस्त असलेल्या मोदींना जम्मू-कश्मीरमध्ये निर्घृणपणे ठार मारण्यात आलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या किंकाळ्याही ऐकू येत नाहीत, असा संताप राहुल यांनी व्यक्त केला.

वाढते दहशतवादी हल्ले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर काँग्रेसने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. पाकिस्तानी नेत्यांच्या शुभेच्छांनाही मोदी यांनी एक्सद्वारे दाद दिली. परंतु, निर्घृण दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. 10 वर्षांपासून मोदी सरकार खोटी छाती बडवत आहे. मात्र प्रत्यक्षात आजही निष्पाप नागरिक दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत असून स्थिती अजिबात बदललेली नाही, अशी टीका काँग्रेसने केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पोस्टवर प्रतिक्रीया देण्यात मोदी व्यग्र आहेत. परंतु, दहशतवादी हल्ल्यांबाबत का गप्प आहेत? असा सवाल काँग्रेसने केला आहे.