इकडे आड, तिकडे विहीर; अमेरिकेसोबतच्या ‘ट्रेड डील’मुळे कापूस उत्पादक आणि वस्त्रोद्योग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे देशातील कापूस उत्पादक आणि वस्त्रोद्योग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी हा मुद्दा संसदेतही उपस्थित केला होता. याच संदर्भात त्यांनी आता एक व्हिडीओ जारी करत केंद्र सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत.

देशातील वस्त्रोद्योग हा जवळपास 5 कोटी कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. मात्र, केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या नव्या व्यापार करारामुळे हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या करारामुळे देशातील कापूस उत्पादक शेतकरी आणि कापड निर्यातदार ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशा कात्रीत सापडले आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

अमेरिकेने बांगलादेशला वस्त्रोद्योगातील निर्यातीवर शून्य टक्के सवलत दिली आहे, तर हिंदुस्थानी कापडावर 18 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत हिंदुस्थानी कापड महाग होऊन आपली स्पर्धात्मकता संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जेव्हा संसदेत या विषमतेवर प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा सरकारने धक्कादायक खुलासा केला. अमेरिकेकडून ही सवलत मिळवण्यासाठी अमेरिकन कापूस आयात करण्याची अट घालण्यात आली आहे

यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, जर आपण अमेरिकन कापूस आयात केला, तर हिंदुस्थानातील कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागेल. जर अमेरिकन कापूस आयात केला नाही, तर 18 टक्के टॅरिफमुळे आपला वस्त्रोद्योग बांगलादेशच्या तुलनेत मागे पडून बंद पडेल. यावेळी राहुल गांधी यांनी अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराला विनाशकारी म्हणत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावरही खोटेपणाचा आरोप केला.

पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कॅबिनेटने हा करार करताना देशातील 5 कोटी कुटुंबांच्या रोजगाराचा विचार केला नाही. ही नीती नसून देशाला आर्थिक संकटात ढकलण्याचे जाळे आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत बांगलादेश हिंदुस्थानकडून कापूस आयात करत होता. मात्र, अमेरिकेच्या अटींनुसार त्यांनी तिथून कापूस घेणे सुरू केल्यास, हिंदुस्थानची कापूस निर्यातही धोक्यात येईल. यामुळे हिंदुस्थानचा कापूस शेतकरी आणि कापड उद्योग या दोन्ही आघाड्यांवर मोठे नुकसान होणार आहे.

नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनी असा सौदा केला आहे जो कापूस शेतकरी आणि वस्त्रोद्योग निर्यातदार दोघांच्याही मुळावर उठणारा आहे. हे केवळ व्यापारिक अपयश नसून देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत केलेली गद्दारी आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.