कुठे गेल्या 12 हजार विशेष गाड्या? ट्रेनमधील गर्दीवरून राहुल गांधी यांचा सवाल

सणानिमित्त दिल्लीतून लोक उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आपल्या घरी निघाले होते. पण यावेळी दिल्ली स्थानकावर प्रचंड गर्दी होती. यावरू राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कुठे गेल्या 12 हजार विशेष गाड्या? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी म्हणाले की, सणांचा महिना आला आहे. दिवाळी, भाऊबीज, छठ. बिहारमध्ये हे सण म्हणजे फक्त श्रद्धेचे प्रतीक नाहीत, तर घराकडे परतण्याची ओढ आहे. मातीतली सुगंध, कुटुंबाचे ममत्व आणि गावाचे आपलेपण.

पण आता ही ओढ एक संघर्ष बनली आहे. बिहारकडे जाणाऱ्या गाड्या ठासून भरलेल्या आहेत, तिकीट मिळणे अशक्य झाले आहे आणि प्रवास अमानुष बनला आहे. अनेक गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा 200% प्रवासी आहेत. लोक दरवाज्यांवर आणि छतांवर लटकलेले दिसतात.

फेल झालेल्या ‘डबल इंजिन सरकार’चे दावे आता पोकळ ठरत आहेत. कुठे आहेत त्या 12,000 विशेष गाड्या?
प्रत्येक वर्षी परिस्थिती आणखी वाईट का होत चालली आहे? बिहारच्या लोकांना दरवर्षी अशा अपमानजनक परिस्थितीत घराकडे परतण्यास का भाग पाडले जाते?

जर राज्यात रोजगार आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळाली असती, तर त्यांना हजारो किलोमीटर दूर भटकंती करावी लागली नसती. हे फक्त असहाय्य प्रवासी नाहीत, तर NDAच्या फसव्या धोरणांचे आणि नीयतीचे जिवंत पुरावे आहेत. सुरक्षित आणि सन्मानजनक प्रवास हा अधिकार आहे, उपकार नाही असेही राहुल गांधी म्हणाले.