मोदींना वाटतेय केवळ एक व्यक्ती देश चालवतेय!

सामना ऑनलाईन । बरगारी

पंतप्रधान मोदींना वाटतेय की केवळ एकच व्यक्ती देश चालवतेय, पण प्रत्यक्षात जनताच देश चालवतेय. एक वेळ होती जेव्हा मोदी हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची खिल्ली उडवायचे, पण आता गेली पाच वर्षे जनताच मोदींची खिल्ली उडवत आहे अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.

पंजाबच्या फरीदकोट लोकसभा मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या ठिकाणी एका धर्मग्रंथाचा अपमान करण्यात आला होता त्यावेळी मी इथे आलो होतो. त्यांनी धर्मग्रंथाचा अपमान केला. त्यांना शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असे आश्वासनही राहुल यांनी यावेळी जनतेला दिले. राफेल मुद्दय़ावरून मोदींनी आपल्याशी चर्चा करावी असे आव्हानही राहुल यांनी यावेळी दिले. मोदींच्या जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागल्याचेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.