आता हायड्रोजन बॉम्ब फोडल्यानंतर पंतप्रधान मोदींना चेहरा लपवण्यासाठीही जागा उरणार नाही, राहुल गांधी यांचे सूचक विधान

ज्या शक्तींनी महात्मा गांधींना मारलं, तीच शक्ती संविधान नष्ट करण्याच्या तयारीत आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तसेच मतचोरीवर झालेली पहिली पत्रकार परिषद तर फक्त अॅटम बॉम्ब होती आता हायड्रोजन बॉम्ब फोडल्यानंतर पंतप्रधान मोदींना चेहरा लपवण्यासाठीही जागा उरणार नाही, असे सूचक विधान राहुल गांधी यांनी केले आहे.

बिहारमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ज्या शक्तींनी महात्मा गांधींना मारलं, तीच शक्ती संविधान नष्ट करण्याच्या तयारीत आहेत. काहीही झालं तरी आम्ही त्यांना संविधानाची हत्या करू देणार नाही. म्हणून बिहारमध्ये आम्ही यात्रा सुरू केली आणि जनतेने आम्हाला साथ दिली. सगळे तरुण आमच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा व्होट चोर गद्दी छोड हा नारा पसरला आहे. आणि भाजपचे लोक आम्हाला काळे झेंडे दाखवत होते. भाजपच्या लोकांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही अॅटम बॉम्बचे नाव ऐकलंय का त्याच्यापेक्षा हायड्रोजन बॉम्ब असतो. आधी आम्ही फक्त अॅटम बॉम्ब दाखवला होता आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब दाखवणार आहोत. भाजपने जी मतांची चोरी केली होती ती सगळ्या देशाला कळणार आहे. बिहारची माती ही क्रांतीकारी आहे, बिहारने संपूर्ण देशाला संदेश दिला आहे की मतांची चोरी होऊ देणार नाही. या हायड्रोजन बॉम्ब नंतर मोदी देशाला आपला चेहराही दाखवू शकणार नाहीत असेही राहुल गांधी म्हणाले.