
हिंदुस्थानच्या सागरी हद्दीत अमेरिकेने हल्ला करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीच का बोलत नाहीत, ते गप्प का, असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला.
इराणची ‘आयरिस देना’ ही युद्धनौका अमेरिकेने बुडवल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी ‘एक्स’ पोस्ट केली. ‘अमेरिका-इराण संघर्ष आपल्या अंगणात पोहोचला आहे. हिंद महासागरात एक इराणी युद्धनौका बुडाली आहे. तरीही पंतप्रधान काहीही बोललेले नाहीत. अशा परिस्थितीत ठाम आणि स्थिर भूमिका घेणारे नेतृत्व हवे आहे. प्रत्यक्षात चित्र उलटे आहे. आपल्याला हाराकिरी पत्करणारे पंतप्रधान लाभले आहेत. त्यांनी देशाची धोरणात्मक स्वायत्तता अमेरिकेच्या हवाली केली आहे,’ असा टोला त्यांनी हाणला.
तुमच्या दारात पाहुण्यांना मारले, कसला नवा भारत?
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला केला. ‘हिंदुस्थान आजवर आपल्या ताकदीवर आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर हिंद महासागरात पहारा देत आला आहे. 1986 मध्ये राजीव गांधी यांनी अमेरिकेला श्रीलंकेत साधा ट्रान्समीटर लावू दिला नव्हता. आज आमच्या दारात आमच्या निःशस्त्र पाहुण्यांना अमेरिकेने मारले आणि हे सरकार नव्या भारताच्या गोष्टी सांगते. हा कसला नवा भारत,’ असा सवाल खेरा यांनी केला. ‘मोदी सरकार हिंद महासागराचे रक्षक नसून ‘गँग्स ऑफ एपस्टीन’चे प्यादे आहे,’ असा टोला त्यांनी लगावला.


























































