Operation Sindoor – आम्हाला सैन्यदलांचा अभिमान, ऑपरेशन सिंदूरवर राहुल गांधीसह इतर नेत्यांनी पहिली प्रतिक्रिया

हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तान वर ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले आहे. आम्हाला सैन्यदलांचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे. तसेच भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, आम्हाला सैन्यदलावर अभिमान आहे, जय हिंद.

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी हिंदुस्थानी सैन्याची पोस्ट शेअर करत जय हिंद म्हटले आहे.

 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाक व्याप्त कश्मीरमधील सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात कठोर धोरण राबवले आहे. आम्हाल आमच्या सैन्याचा अभिमान आहे. सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. आम्ही त्यांच्या या शौर्याचे कौतुक करतो. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यापासून काँग्रेसने सरकारला आणि सैन्याला दहशतवाद संपवण्यासाठी ठाम पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय एकता आणि ऐक्य ही काळाची गरज आहे. काँग्रेस आपल्या देशाच्या सशस्त्र दलांसोबत खंबीरपणे उभे आहे. आमच्या नेत्यांनी भूतकाळात मार्ग दाखवले आहे आणि राष्ट्रीय हित हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे.

शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की,
आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन!जय हिंद!

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत माता की जय अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही हिंदुस्थानी सैन्याची पोस्ट शेअर करत आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. जय हिंद अशी प्रतिक्रिया दिली आहे.