ही मोदींची पॉलिसी… मला विदेशी नेत्यांना भेटू देत नाहीत! राहुल गांधी यांची टीका

‘विदेशी नेते किंवा प्रतिनिधी हिंदुस्थानात आले की विरोधी पक्ष नेत्यांनाही त्यांची भेट दिली जाते. सरकार स्वतः त्यासाठी पुढाकार घेते. अशी प्रथा आणि परंपरा आहे. मात्र, मोदी सरकार या प्रथा-परंपरा पाळत नाही. ही त्यांची पॉलिसीच आहे,’ अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राहुल बोलत होते. पुतीन यांच्या दौऱयात विरोधी पक्षाच्या नेत्यांशी भेटीचा कुठलाही कार्यक्रम नाही. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. ‘पूर्वी बाहेरच्या देशातून एखादा नेता हिंदुस्थानात आला की विरोधी पक्षाच्या नेत्याशीही त्याची बैठक होत असे. तशी परंपरा आहे. अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्या काळातही हे व्हायचे. अलीकडे तसे होत नाही. हल्ली हिंदुस्थानात जेव्हा विदेशी प्रतिनिधी येतात किंवा मी एखाद्या देशात जातो तेव्हा मला भेट देऊ नका, अशी सूचना आपले सरकार तिकडच्या प्रशासनाला देते. ही मोदी सरकारची पॉलिसीच आहे ,’ असा गौप्यस्फोट राहुल यांनी केला.