ट्रम्प यांच्या धमकीचा सामना करण्यास मोदी असमर्थ, अमेरिकेत अदानींच्या चौकशीमुळे हात बांधलेले – राहुल गांधी

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या धमक्या आणि हिंदुस्थानवरील 25 टक्के आयात कर (टॅरिफ) लादण्याच्या घोषणेनंतरही पंतप्रधान मोदी गप्प का आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. यामागील कारण म्हणजे गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील चौकशी असल्याचा दावा त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सक पोस्ट करत लिहिले की, “हिंदुस्थानींनो, कृपया हे समजून घ्या, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या वारंवार धमक्यांना सामोरे जाऊ शकत नाहीत, याचे कारण अदानी यांच्यावरील अमेरिकेतील चौकशी आहे. ट्रम्प यांना मोदी, अदानी आणि अंबानी (AA) यांच्यातील आर्थिक संबंध आणि रशियन तेल सौद्यांबाबत माहिती आहे. यामुळे मोदींचे हात बांधले गेले आहेत.”

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याचा कार्यकारी आदेश बुधवारी सायंकाळी जारी केला. यामुळे हिंदुस्थानवर एकूण 50 टक्के आयात शुल्क लागू झाले आहे. या नव्या शुल्कामुळे हिंदुस्थानच्यानिर्यात क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.