स्मृती इराणींबद्दल अपशब्द काढाल तर खबरदार! राहुल गांधींची काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकीद

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यावर असभ्य भाषेत टीका करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांनी खडसावले आहे. कोणत्याही नेत्याने स्मृती इराणींबद्दल चांगली-वाईट कोणतीही टीका करू नये, अशी ताकीदच राहुल गांधींनी कार्यकर्त्यांना दिली.

जीवनात यश-अपयश येत असते. मात्र एखाद्याचा अपमान करणे हे ताकदवान असण्याचे नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे. त्यामुळे असे वागणे टाळा, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी ट्विट करत क्राँग्रेस कार्यकर्त्यांची कानउघडणी केली आहे.

अमेठी लोकसभा मतदार संघातून स्मृती इराणी यांना पराभूत करून काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांनी निवडणूक जिंकली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्मृती इराणी यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तसेच सरकारी बंगला सोडण्यावरूनही त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.