
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 646 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसामुळे रायगड जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या 28 धरणांपैकी 25 धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. सर्व धरणामध्ये 67.989 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या धरणांमध्ये जमा झाला आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे पुढील वर्षीच्या मे महिन्यापर्यंत रायगडवासीयांचे पाण्याचे टेन्शन संपले आहे.
डॅम तुडुंब
सुतारवाडी, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, वरंघ, कोडगाव, उन्हेरे, कवेळे, भिलवले, वावा, फणसाड, घोटवडे, कोलते-मोकाशी, डोणवत, आंबेघर, मोरबे, अवसरे, बामणोली, ढोकशेत ही धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत तर कार्ले धरणात 98, रानिवली 92, पुनाडे 58 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
कोलाड येथील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या 28 प्रकल्पात मे महिन्यात 23 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यातील 9 घरणांमध्ये दहा टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे ढग दाटले होते. मे महिन्याच्या शेवटी तुरळक पाऊस पडला. यांनतर जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला. जुलै महिन्यात सरासरीच्या मानाने कमी पाऊस पडला. यांनतर ऑगस्ट महिन्यात पावसाची संततधार सुरू होती. सध्याही पावसाची संततधार सुरू आहे. आतापर्यंत धरणांच्या क्षेत्रातही चांगल्या पावसाची नोंद झाली.
कोलाडच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या 28 धरणांपैकी 25 धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. उर्वरित तीन धरणांपैकी २ धरणांमध्ये सरासरी संचय क्षमतेच्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. तर उर्वरित एका घरणात संचय क्षमतेच्या 58 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणामध्ये 69.989 दशलक्ष घन मीटर पाणीसाठा या धरणांमध्ये जमा झाला आहे.