
रायगडात माता-भगिनी असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२५ या पाच वर्षांत ५०८ महिलांवर अत्याचार आणि ६६६ विनयभंग झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी योजनांची घोषणाबाजी करणारे सरकार प्रत्यक्षात मात्र महिलांची सुरक्षा करण्यात फेल ठरले आहे.
रायगड जिल्ह्यात महिलांवर लैंगिक अत्याचार, विनयभंग, अपहरण यांसारखे मोठे गुन्हे सातत्याने घडत असून दर आठवड्याला सरासरी चार ते पाच महिला या गुन्ह्यात बळी पडत आहेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी, प्रवासात महिला प्रवाशांशी अंगलट, अल्पवयीन विद्यार्थिनींशी चाळे, महाविद्यालय आवारात छेडखानी, लज्जा उत्पन्न करणारे कृत्य असे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. लग्नाचे आमिष दाखवून, नोकरीत बढती देण्याचे आमिष तसेच इतर प्रकारे शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या तक्रारीही दाखल होत आहेत. पूर्वी अत्याचाराला बळी पडलेल्या महिला बदनामीला घाबरून गप्प बसत असत. मात्र आता महिला आपल्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवू लागल्या आहेत. त्या पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करू लागल्या असल्याचे दाखल तक्रारींच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास स्पष्ट होते.
जिल्ह्यात मागील पाच वर्षांत अत्याचार व विनयभंगाचे ११७४ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. यामधील ९८.८० टक्के म्हणजे १ हजार १६० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे.
महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथक
रायगड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. त्यांना मोटारसायकल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या पथकाला विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्रकिनारे आणि गर्दीच्या ठिकाणी या पथकाची नियमित गस्त सुरू असते. या पथकांचे नंबर शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना उपलब्ध करून दिले असून या नंबरवर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथक घटनास्थळी दाखल होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. मात्र एवढे प्रयत्न करूनही अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या दिसत नाहीत.



























































