
रायगड जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण येत्या मंगळवारी 15 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. या सोडतीची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी देवाचा धावा सुरू केला आहे. कोण होणार गावचा सरपंच? अशी तर्कविर्तकांची चर्चा आता चौकाचौकात सुरू झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती खुला प्रवर्गासाठी 16 तर महिला प्रवर्गासाठी 17 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची जागा आरक्षित करण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती खुला प्रवर्गासाठी 62, महिलांसाठी 62, मागास प्रवर्ग खुला गटासाठी 109, महिलांसाठी 110, सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी 217, महिलांसाठी 217 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची जागा आरक्षित करण्यात येणार आहे. 2025 ते 2023 या कालावधीकरिता सदर आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती महाड तालुक्यात 134 तर सर्वात कमी ग्रामपंचायती मुरुड तालुक्यात 24 आहेत.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
अलिबाग तालुक्यात 62, मुरुड तालुक्यात 24, पेण तालुक्यात 64, पनवेल तालुक्यात 71, उरण तालुक्यात 36, कर्जत तालुक्यात 55, खालापूर तालुक्यात 45, रोहा तालुक्यात 64, सुधागड तालुक्यात 33, माणगाव तालुक्यात 74, तळा तालुक्यात 25, महाड तालुक्यात 134, पोलादपूर तालुक्यात 42, श्रीवर्धन तालुक्यात 43 आणि म्हसळा तालुक्यात 39 ग्रामपंचायती आहेत. या सर्वच ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे गावागावातील सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले आहे.