
राष्ट्रीय महामार्गावरील कशेळे ते वंजारवाडी दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास कारवाई करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र खड्यांमुळे सतत अपघात होऊनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन हवेत विरल्याने संतप्त गावकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी श्रमदान करून जीवघेणे खड्डे बुजवले.
कर्जत व मुरबाडला जोडणारा हा मुख्य रस्ता असून त्या रस्त्यावरील कशेळे ते वंजारवाडी भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे अपघात सत्र सुरू असून अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला. प्रशासन व लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी गावकऱ्यांनी केला. पावसाळा जाऊन आता दोन महिने उलटले तरीही रस्त्यांची तीच अवस्था आहे. खड्डे भरणार कधी, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
कुंभकर्णी प्रशासन
कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी कर्जतच्या जय हनुमान मंडळासह ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून श्रमदान केले. ‘प्रशासन झोपले तरी आम्ही झोपलेलो नाही’ असा इशारा देत गावकऱ्यांनी मातीचा भराव टाकून रस्ते दुरुस्त करण्यास सुरुवात केली.






























































