सत्तेत एकत्र बसले… पदासाठी रुसले; रायगड जिल्हा परिषदेत अर्थ, बांधकाम समितीवरून भाजप-शिंदे गटात रस्सीखेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजप, अजित पवार गट व शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. मात्र अर्थ व बांधकाम समितीसारख्या क्रिम समितीवरून कमळाबाई व शिंदे गटाने एकमेकांसमोर शड्डू ठोकला असून रुसवे-फुगवे सुरू झाले आहेत. मात्र हा तिढा स्थानिक पातळीवर सोडवता न आल्याने यावर आता मुंबईत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार आहे.

अलिबाग शहरातील जिल्हा नियोजन भवन येथे विषय समिती सभापती निवडणुकीसाठी बैठक झाली. अपेक्षेप्रमाणे आरक्षित विषय समिती सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. भाजपचे वैकुंठ पाटील, अजित पवार गटाचे नारायण डामसे, शिंदे गटाचे चंद्रकांत कळंबे व रसिका केणी यांची विषय समिती सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. मात्र उर्वरित अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन या समित्यांपैकी अर्थ व बांधकाम समितीवरून भाजप व शिंदे गट आमनेसामने आले आहेत. अर्थ व बांधकाम समितीवर भाजप व शिंदे गट दोघांनीही दावा केल्याने या समित्यांची निवड बारगळली. आता यावर मुंबईत भाजप व शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचे समजते.

सर्वाधिक जागा जिंकूनही नशिबी फरफटच

रायगड जिल्हा परिषदेत शिंदे गटाने सर्वाधिक २१ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने अवघ्या १५ जागा जिंकूनही खासदार सुनील तटकरे यांच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळवले होते. आताही अर्थ व बांधकाम खाते शिंदे गटाकडे जाऊ नये यासाठी भाजपने अजित पवार गटाला हाताशी धरून खेळी केली आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही नशिबी फरफटच आल्याने शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे.