
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेने क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू केली असली तरी या मोहिमेला अपेक्षित यश मिळालेले नाही. जिल्ह्यात एकूण २ हजार ५४९ क्षयरुग्णांवर उपचार सुरू असतानाच जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत आणखी ८७९ नवे क्षयरुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोर क्षयरोग मुक्तीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने क्षयरोग रुग्ण मोहिमेला वेग दिला असला तरी ग्रामीण तसेच दुर्गम भागातून ८७९ नवे क्षयरुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण २ हजार ५४९ क्षयरुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही रुग्णांकडून उपचार अर्धवट सोडून देणे, वेळेत तपासणी न करणे आणि सामाजिक भीतीमुळे आजार दडवून ठेवणे यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींपैकी ३६५ ग्रामपंचायतींमध्ये क्षयरुग्णांची आकडेवारी वाढल्याचे समोर आले आहे. २०२३ पासून क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान सुरू आहे. मात्र या अभियानाला तीन वर्षे उलटल्यानंतरही ३६५ ग्रामपंचायती क्षयमुक्त झालेल्या नाहीत.
क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा
आरोग्य प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील ४४५ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असल्या तरी संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करायचा आहे. नागरिकांनीही क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्या व त्वरित उपचार सुरू करा.
डॉ. प्राची नेहुलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद



























































