धक्कादायक, रेल्वे तिकिटातून टेरर फंडिंग

459

रेल्वे तिकिटातून टेरर फंडिंग होत असल्याचा धक्कादायक खुलासा आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा दलाने केला आहे. आरपीएफने अशा प्रकारच्या ई-तिकिटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचे धागेदोरे दुबई, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये असल्याचेही आरपीएफने म्हटले आहे. रॅकेटचा म्होरक्या दुबईत असून या प्रकरणात करण्यात आलेल्या तपासादरम्यान धक्कादायक प्रकारची माहिती समोर आली. या रॅकेटप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तब्बल 2,400 शाखांमध्ये त्याची 3 हजार खाती आणि आयआरसीटीसीचे 563 आयडी असल्याचे उघड झाले आहे. ई-तिकिटिंग रॅकेटप्रकरणी अटक आरोपी मुस्तफा याची आयबी, स्पेशल ब्युरो, ईडी, एनआयए आणि कर्नाटक पोलिसांनी गेल्या दहा दिवसांत कसून चौकशी केली.

रेल्वे तिकिटांमध्ये मोठय़ा प्रमाणावर काळा बाजार होत असून आरपीएफने झारखंडमधून एकाला ताब्यात घेतले. दहशतवाद्यांना रसद पुरवण्यात त्याचा समावेश असल्याचा संशय आहे. गुलाम मुस्तफा असे त्याचे नाव असून त्याला भुवनेश्वर येथून ताब्यात घेण्यात आले. मुस्तफाचे शिक्षण मदरशात झाले असून त्याने सॉफ्टवेअर डेव्हलपिंगचे शिक्षणही घेतले आहे. त्याच्या नावावर एसबीआयच्या 2,400 आणि ग्रामीण भागात बँकेच्या 600 शाखांमध्ये त्याची खाती असल्याचीही माहिती उघड झाली.

रॅकेटच्या मास्टरमाइंडचा बॉम्बस्फोटातही समावेश
या रॅकेटचा म्होरक्या मास्टरमाईंड सॉफ्टवेअर डेव्हलपर हामिद अशरफ याचा 2019 मध्ये गोंडाच्या शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग होता. तो दुबईत असल्याचा संशय असून विविध प्रकारच्या काळय़ा धंद्यांमधून अशरफ दर महिन्याला 10 ते 15 कोटी रुपये कमावत असल्याचेही आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या