यंदा पाऊस चांगला, पेरणीसाठी घाई नको; हवामान तज्ञांचा सल्ला

राज्यामध्ये यंदा जून-जुलै या दोन महिन्यात कमी पाऊस असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात चांगला पाऊस होईल. जून महिन्यात राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यात शंभर टक्के पावसाची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पाऊस चांगला असला तरी कुठे जास्त, तर कुठे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरणी करताना घाई करु नये, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाले असले तरी त्याला पोषक वातावरण नसल्याने पुढे सरकायला वेळ लागेल. त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसांत महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करेल. परंतु सुरुवातीला पाऊस झाले तरी त्यामध्ये नंतर खंड पडणार असून, भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करण्यासाठी शेतकऱयांनी घाई करू नये. यंदा कोकणात चांगला पाऊस होईल, त्यामुळे भात पिकाचे उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर या काळात जास्त पाऊस होईल, असे हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले.