दिवाळी, नाताळच्या आनंदावरही पाणी पडणार? डिसेंबरपर्यंत कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. असं असलं तरी मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पार डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदाज साउथ एशियन क्‍लायमेटने आउटलुक फोरमने (सॅस्कॉफ) हा अंदाज वर्तवला आहे. मॉन्सूनोत्तर हंगामामध्ये मराठवाडा आणि विदर्भातही सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे दिवाळी, नाताळच्या सणांच्या आनंदावरही पाणी पडणार का अशी भीती वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या हंगामोत्तर पावसाचा आढावा घेण्यासाठी तसेच सध्याच्या पावसाबाबतचा आढावा घेण्यासाठी सॅस्कॉफची 17 वी बैठक नुकतीच पार पडली होती. या बैठकीमध्ये दक्षिण आशियाई देशांतील राष्ट्रीय व विभागीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्था सहभागी झाल्या होत्या.

हंगामी पाऊस आणि हंगामोत्तर पाऊस
हिंदुस्थानात 1 ऑक्टोबरनंतर पडणाऱ्या पावसाला हंगामोत्तर पाऊस म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर याला परतीचा पाऊसही म्हटलं जातं. सस्कॉफने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये परतीचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता 50 टक्क्यांहून अधिक आहे. उर्वरीत राज्यात परतीचा पाऊस सरासरी पडण्याची शक्यताही अधिक आहे. सॅस्कॉफकडे 1961 नंतर पुढील 49 वर्षांची पावसाची आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार कोकणात परतीच्या पावसाची सरासरी 139.6 तर मध्य महाराष्ट्रात 103.1 मिमी इतकी आहे.

देशात आबादीआबाद करून मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. परतीच्या प्रवासातही मान्सून मेहेरनजर करणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तो मनसोक्त ‘शंभर’ टक्के बरसला. 61 वर्षांत प्रथमच लागोपाठ दुसऱया वर्षीही शंभर टक्के पाऊस पडला. हवामान खात्याने दिलेल्या मुहूर्तावर मान्सूनचे आगमन झाले. अंदमान, निकोबारमध्ये बरसून मान्सूनने केरळची किनारपट्टी गाठली. रोहिणी काय, मृग काय… पावसाने विश्रांतीच घेतली नाही. नद्यांच्या उत्साहाला उधाण आले. धरणे, तलाव, जलाशये ओसंडून वाहू लागली. देशात सगळीकडे आबादीआबाद करून मान्सूनने आपला परतीचा प्रवास चालू केला आहे. 17 सप्टेंबर हा मान्सूनच्या परतीचा मुहूर्त; पण यंदा पावसाने दहा दिवस उशिराने निरोप घेतला आहे. राजस्थान व पंजाबातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. परतीच्या प्रवासातही मान्सून बरसत बरसत आपल्या गंतव्याकडे जात असतो. त्यामुळे पावसाळा साधारण 15 ऑक्टोबरपर्यंत गृहित धरला जातो.

हवामानतज्ञ आर. के. जेनामनी यांनी ‘निसर्ग’ वादळाने मान्सूनला जमिनीकडे खेचण्यासाठी मदत केली, त्यामुळे 1 जून रोजीच मान्सूनने आपल्या आगमनाची वर्दी दिली असे सांगितले. सामान्यतः संपूर्ण देशात मान्सून 8 जुलैपर्यंत येतो. परंतु यंदा मात्र तो 26 जूनलाच देशाच्या कानाकोपऱयात पोहोचला. यापूर्वी 1958 मध्ये 109.8 टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर 1959 मध्ये 114.3 टक्के पावसाची नोंद झाली होती. त्याअगोदर 1916 मध्ये 110 टक्के आणि 1917 मध्ये 120 टक्के पाऊस झाला होता. 2019 मध्ये 110 टक्के पाऊस झाला असून 2020 मध्ये तो 109 टक्के बरसला आहे. देशातील 36 विभागांपैकी 31 विभागांमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या