
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची भांडुप येथील ‘मैत्री’ निवासस्थानी भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार संजय राऊत सध्या घरीच विश्रांती घेत आहेत. आज दुपारी राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहचले. जवळपास अर्धा तास राज ठाकरे तिथे होते. त्यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. याबाबत नंतर आमदार सुनील राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली.
‘राज ठाकरे फोनवरून माझ्या संपर्कात होते. संजय राऊत यांच्या तब्येतीची नियमित माहिती घेत होते. काय उपचार सुरू आहेत ते जाणून घेत होते. आज ते संजय राऊत यांना भेटले. तब्येतीची काळजी घ्या. लोकांमध्ये न मिसळता आणखी दीड महिना आराम करा. पूर्ण बरे वाटल्यानंतर बाहेर पडा’, असा सल्ला त्यांनी दिल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले.


























































