
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्यामुळे तब्बल ३२ तास वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ‘दोन शहरांतील वाहतूक ३२ तास ठप्प होते आणि सरकार त्याकडे स्वस्थपणे बघते, हा कोडगेपणा अनाकलनीय आहे’, अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला काही रोखठोक सवाल विचारले आहेत. मंगळवारी झालेल्या अपघातानंतर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणतात की, ‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे’.
टोल वसुलीवर निशाणा
द्रुतगती मार्गाच्या दुरवस्थेवर बोट ठेवताना त्यांनी टोलच्या मुद्द्यावरूनही प्रशासनाला धारेवर धरले. ‘स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली’, असा टोला त्यांनी लगावला.
प्रवाशांचा टोल परत करा!
राज ठाकरे यांनी सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. ज्या प्रवाशांना या ३२ तासांच्या कोंडीचा फटका बसला, त्यांचा टोल सरकारने परत केला पाहिजे. ‘ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे’, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
पालकमंत्र्यांच्या वादावरून टोला
सरकारमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.’
Raj Thackeray slams maharashtra govt over 32 hour traffic jam on mumbai pune expressway
MNS chief Raj Thackeray criticizes state government after mumbai pune expressway remained shut for 32 hours. he demands toll refund for affected passengers and a concrete action plan.

























































