
हिंदुस्थानी चित्रकलेच्या इतिहासात बुधवारी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या अजरामर तैलचित्राने लिलावात आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मुंबईत पार पडलेल्या सॅफ्रनआर्टच्या ‘स्प्रिंग लाइव्ह’ लिलावात या चित्राची 167.20 कोटी रुपयांना विक्री झाली. हिंदुस्थानी कलेतील आतापर्यंतची सर्वात महागडी कलाकृती ठरली आहे.
हिंदुस्थानी चित्रकलेचे जनक मानले जाणारे राष्ट्रीय चित्रकार राजा रविवर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या दुर्मिळ चित्राचा विक्रमी लिलाव झाला आहे. प्रसिद्ध उद्योगपती आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा सायरस पूनावाला यांनी ही ऐतिहासिक बोली लावत हे चित्र आपल्या संग्रही केले आहे. राजा रविवर्मा यांनी 1890 च्या दशकात, आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना हे चित्र साकारले होते. या चित्राची मूळ अंदाजे किंमत 80 ते 120 कोटी रुपयांच्या दरम्यान वर्तवण्यात आली होती, मात्र प्रत्यक्ष लिलावात त्याने या आकड्यालाही मागे टाकले. हे प्रतिष्ठित चित्र सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस एस. पूनावाला यांनी विकत घेतले आहे. ही कलाकृती मिळवणे हे आपले भाग्य असल्याचे सांगत, हा राष्ट्रीय ठेवा भविष्यात वेळोवेळी सार्वजनिक प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देण्याचा मानस पूनावाला यांनी एका निवेदनात व्यक्त केला आहे.
या कलाकृतीमध्ये मातृप्रेमाचा एक अत्यंत हळवा आणि पवित्र क्षण टिपण्यात आला आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची माता यशोदा यांच्यातील जिव्हाळा या चित्राचा केंद्रबिंदू आहे. यशोदा माता गायीचे दूध काढत असताना बाळ कृष्ण मागून दुधाचा पेला घेण्यासाठी आपला हात पुढे करत आहेत, असे दृश्य यात अत्यंत बारकाव्याने रंगवण्यात आले आहे. एक सामान्य क्षण असूनही त्यात असणारी भावनिक खोली यामुळे हे चित्र राजा रविवर्मा यांच्या सर्वात महत्त्वाच्या रचनांपैकी एक मानले जाते.

























































