
राजस्थानातील जोधपूरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देव दर्शन करून परतत असताना रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलर धडकली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जोधपूरमधील माटेवाडा येथे रविवारी संध्याकाळी हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
सर्व मयत भाविक जोधपूरमधील सुरसागर येथील रहिवासी होते. कोलायत मंदिरात दर्शन घेऊन सर्वजण जोधपूरला परतत होते. यादरम्यान भारतमाला एक्सप्रेसवेवर टेम्पो ट्रॅव्हलरचा अतिवेग आणि कमी दृश्यमानता यामुळे चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नाही. यामुळे ट्रॅव्हलर ट्रकला धडकली आणि अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मिळते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरचा चक्काचूर झाला. यात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला. तीन जखमींना तात्काळ ओसियन रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना ग्रीन कॉरिडॉरने जोधपूरला रेफर करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला, असे फलोदीचे पोलीस अधीक्षक कुंदन कंवरिया यांनी सांगितले.
पोलीस, एसडीआरएफ आणि मदत पथकांनी घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच जोधपूरचे पोलीस आयुक्त ओमप्रकाश माथूर यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला.
























































