
राजस्थानमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया हिचा सोमवारी रात्री जयपूरमध्ये एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतल्याने राजस्थानी कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
हा अपघात जयपूरच्या शिप्रा पथ रोडवर घडला. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हर्षिल आपले काम संपवून कारने घरी परतत होती. प्रवासादरम्यान तिचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार जोरात दुभाजकाला धडकली. धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यावरच उलटली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, कार दुभाजकाला धडकल्यानंतर डाव्या बाजूला पलटी झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत कार सरळ केली आणि हर्षिलला बाहेर काढले.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली. हर्षिलला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो कुटुंबीयांच्या स्वाधीन केला आहे.
हा अपघात भरधाव वेगामुळे झाला की दुसऱ्या एखाद्या वाहनाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे कारचे नियंत्रण सुटले, याचा तपास पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. हर्षिलने मनोरंजन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती: तिने ‘क्राइम नेक्स्ट डोअर’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये काम केले होते. एका न्यूज चॅनेलमध्ये तिने अँकर म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. अनेक राजस्थानी गाण्यांमध्ये तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. सध्या ती मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रियपणे काम करत होती.































































