
रजत पाटीदारने या वर्षीच्या सुरुवातीला आरसीबीला आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या दुलीप करंडकात मध्य विभागाला विजय मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला. या अनुभवामुळे स्वतःच्या नेतृत्वकौशल्यात प्रचंड सुधारणा झाल्याचे पाटीदार अभिमानाने म्हणाला. तसेच आता 30 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थान ‘अ’ संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असल्याची कबुलीही रजत पाटीदारने दिली. माझ्यासह संपूर्ण संघासाठी आपल्या क्षमतेचा वापर करून दाखविण्याची आणि हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत सहभागी होण्याची सुवर्णसंधी असल्याचेही तो म्हणाला.