
अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्य़ामागे हिंदूविरोधी शक्ती असल्याचा आरोप सत्ताधारी भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केला जात आहे. या प्रकरणात अटक झालेले सर्व आरोपी हिंदू आहेत. ज्यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्ट होता ते चंपतराय हेदेखील हिंदूच आहेत; मग हिंदूविरोधी शक्ती कोण, असा सवाल जनतेकडून केला जात आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटय़ांमध्ये जमा झालेल्या निधीची चोरी होणे दुर्दैवी आहे. यामुळे हिंदू समाज आणि रामभक्तांच्या भावना आणि श्रद्धेला धक्का बसला असून, सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, सत्ताधाऱयांकडून या कठीण प्रसंगात हिंदू समाजाने आवश्यक तो संयम बाळगून अशा सर्व कारस्थानांना हाणून पाडण्याचे आवाहन केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हिंदू धर्माला बदनाम करण्याचे षड्यंत्र – मोहन भागवत
अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या चोरीचे हे प्रकरण हिंदू धर्माला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन ‘हिंदूविरोधी आणि देशविरोधी शक्ती हिंदू धर्माची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. सहकार्यवाह दतात्रय होसबळे यांच्या विधानाशी मी पूर्णपणे सहमत असल्याची प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली आहे.
सीईओ शोधण्यासाठी समिती, सुरेश हावरे यांचा समावेश
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये फेररचना करण्यात येणार आहे. ट्रस्टवर लवकरच सीईओंची नियुक्ती करण्यात येणार आहे. नव्या सीईओच्या शोधासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत निवृत्त न्या. प्रमोद कोहली, निवृत्त ले. जनरल विष्णुकांत चतुर्वेदी आणि विश्वस्त सुरेश हावरे यांचा समावेश आहे.
चंपत राय यांनी सोडले मौन
राम मंदिर ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांनी आज प्रथमच मौन सोडले. ट्रस्टच्या सांगण्यावरूनच मी आतापर्यंत बोललो नाही. एसआयटीच्या तपासात सत्य समोर येईल, असे ते म्हणाले.






























































