पालकमंत्री राम शिंदे यांनी केली शिवारात पेरणी

315

सामना प्रतिनिधी । जामखेड

मंत्रीपदाचा लवाजमा बाजूला ठेवून पालकमंत्री राम शिंदे यांनी खरीप हंगामाची पेरणी सुरू असलेल्या शेतात जाऊन स्वतः पेरणी केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी पाऊस पाणी, बियाणे, खते याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी आजुबाजूच्या शिवारातील शेतकरी जमा झाले व पेरणी करणाऱ्या पालकमंत्र्यांना पाहून आवाक झाले.

जामखेड तालुक्याचा दौरा असताना रस्त्यालगत शेतकरी आजिनाथ हजारे यांच्या शेतात पेरणी चालू असल्याचे पाहून पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगून आजिनाथ हजारे यांच्याशी पीक-पाऊस यावर चर्चा केली. शेतकरी कुटुंबातील त्यांच्या जन्म असल्यामुळे पेरणी करण्याचा मोह आवरता आला नसल्याचे सांगत त्यांनी दोर हातात घेऊन शुक्रवारी पेरणीचा आनंद घेतला. यातून त्यांना जुन्या आठवणींना दुजोरा मिळाला.

आज आषाढी एकादशी च्या निमित्ताने “महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होउ दे आणि बळीच राज्य येऊ दे!” अशी राम शिंदे यांनी विठ्ठलाला प्रार्थना केली. काही काळ पेरणीचा आनंद घेऊन हजारे यांच्याशी बातचीत करून शिंदे पुढील नियोजित दौऱ्यास निघाले.

आपली प्रतिक्रिया द्या