
विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनाप्रकरणी विरार पोलिसांनी विकासकाला अटक केल्यानंतर या इमारतीत भागीदार असलेल्या जमीनमालकाच्या दोन मुली आणि दोन जावयांनाही अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यात विकासकाला वाढीव सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून या प्रकरणाचा तपास विरार पोलिसांकडून गुन्हे शाखा 3 कडे सोपवण्यात आला आहे. ही इमारत संपूर्णपणे बेकायदा असून तिच्या दुरुस्तीसाठी पाच वर्षांपूर्वी पालिकेने दुरुस्तीची नोटीस बजावली. परंतु विकासक आणि जागामालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच 17 निष्पाप बळी गेले.
26 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा विजयनगर येथील रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळून त्यात 17 जणांचे बळी गेले. या घटनेने पालघर जिल्हा हादरला. ही इमारत पालिकेची कोणतीही परवानगी न घेता अधिकृतपणे बांधण्यात आल्याची तक्रार पालिकेने विरार पोलीस ठाण्यात केल्यानंतर विकासक नितल साने याला अटक केली. तपासातून पोलिसांना या इमारतीत मूळमालक दळवी कुटुंब हे भागीदार असल्याचे समोर आले. त्यामुळे दळवी कुटुंबातील तीन मुली शुभांगी भोईर (38), संध्या पाटील (35), जावई सुरेंद्र भोईर (46) आणि मंगेश पाटील (35) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. विकासक नितल साने यांना पुन्हा न्यायालयात हजर केले तेव्हा त्यांना सहा दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखा 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांनी दिली.
विकासकासोबत भागीदारी
दळवी कुटुंबातील मूळ जागामालक परशुराम दळवी आणि विकासक नितल साने यांच्यात भागीदारीचा करारनामा झाला. दरम्यान परशुराम दळवी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या दोन मुली आणि जावयांनी बांधकामाची प्रक्रिया पूर्ण केली. 2011 साली बांधकाम झाले. रमाबाई अपार्टमेंटमधील 54 फ्लॅट आणि सहा दुकानांपैकी 32 फ्लॅट आणि तीन दुकाने हे साने कुटुंबाच्या मालकीची तर 22 फ्लॅट आणि 3 दुकाने ही दळवी कुटुंबातील दोन मुलींच्या आणि त्यांच्या पतीच्या नावावर असल्याचे समोर आले. मात्र पालिकेची कोणतीही परवानगी न घेता ही इमारत बेकायदेशीरपणे बांधण्यात आली. 2020 मध्ये पालिकेने दुरुस्तीची नोटीस बजावली. परंतु त्याकडेही जागा मालक आणि विकासकाने दुर्लक्ष केले.