दाक्षिणात्य संघांचे सामन्यावर वर्चस्व ;रणजी करंडक – उपांत्यपूर्व लढती

रणजी करंडकाच्या नॉकआऊट फेरीच्या पहिला दिवस गाजवला तो कर्नाटक आणि आंध्र या दाक्षिणात्य संघांनी. कर्नाटकने उत्तराखंडचा पहिला डाव अवघ्या 116 धावांत गुंडाळल्यानंतर दिवसअखेर बिनबाद 126 अशी भन्नाट सलामी देत पहिल्याच दिवसापासून सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आंध्रने गतविजेत्या मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना थकवताना 2 बाद 262 अशी जोरदार सुरुवात करून दिली. अन्य दोन सामन्यात बंगालने झारखंडला 173 धावांवर संपुष्टात आणले तर सौराष्ट्रने पार्थ भुतच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर  303 अशी मजल मारून पंजाबच्या गोलंदाजांना अक्षरशः थकवले.

 सौराष्ट्रच्या मदतीला भुत धावला

सलामीवीर स्नेल पटेलच्या 70 धावांच्या खेळीनंतरही सौराष्ट्रची घसरगुंडी उडाली. मयांक मार्कंडे आणि बलतेज सिंग यांच्या अप्रतिम माऱयापुढे सौराष्ट्रची 8 बाद 147 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. त्यानंतर नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पार्थ भुतने अद्भुत खेळी करत सौराष्ट्रला अनपेक्षितपणे 303 धावांपर्यंत नेले. त्याने आपल्या रणजी कारकीर्दीतील पहिलेवहिले शतक साजरे करताना 11 चौकार आणि 4 षटकार ठोकले. त्याने नवव्या विकेटसाठी चेतन सकारियासह (22) 61 धावांची भागी रचली तर युवराजसिंह दोडियाबरोबर (17) दहाव्या विकेटसाठी 95 धावांची लाजवाब भागी केली. याच भागीदाऱया सौराष्ट्रला तीनशेपार घेऊन गेल्या.

 पदार्पणातच वेंकटेश पावला!

आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या 22 वर्षीय मध्यमगती गोलंदाज एम. वेंकटेशने रणजी पदार्पण करताना आपल्या तिसऱयाच चेंडूवर सलामीवीर अवनीश सुधाला निकीन जोसकरवी झेलबाद केले. त्यानंतर त्याने आपल्या गोलंदाजीवर एकामागोमाग आणखी चार विकेट्स मिळवित पदार्पणातच 5 बळी टिपण्याचा पराक्रम केला. त्याने 36 धावांत अर्धा संघ गारद केल्यामुळेच उत्तराखंड 116 धावांतच आटोपला.

उत्तराखंडचा डावाला कुणीच सावरू शकले नाही. साखळीत जोरदार कामगिरी करणारा उत्तराखंडचा संघ नॉकआऊट फेरीत पहिल्याच दिवशी गारद झाला. त्यांचा संघ 116 धावांत संपल्यावर कर्नाटकच्या रविकुमार समर्थ आणि मयांक अगरवालने उत्तराखंडच्या गोलंदाजीला थकवताना 26 षटाकांत एकही यश मिळवू दिले नाही. 123 धावांची अभेद्य सलामी देणाऱया रविकुमार समर्थने 54 तर मयांकने 65 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी कर्नाटकने बिनबाद 123 धावा करताना 7 धावांची आघाडी घेतल्यामुळे त्यांनी पहिल्याच दिवशी सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता हा सामना तीन दिवसांत संपला तरी आश्चर्य वाटणार नाही.

 आंध्रचा दमदार खेळ; पहिल्या दिवशी 2 बाद 262

रिकी भुई आणि करण शिंदे यांच्या जोरदार आणि अभेद्य भागीमुळे आंध्रने गतविजेत्या मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्याच दिवशी 2 बाद 262 अशी दमदार मजल मारली. आंध्रचे सलामीवीर सीआर ज्ञानेश्वर आणि अभिषेक रेड्डी यांनी निराशा केली. त्यातच हनुमा विहारी रिटायर्ड हर्ट झाल्यामुळे आंध्र अडचणीत सापडला होता. मात्र त्यानंतर रिकी भुईने करण शिंदेबरोबर डाव सावरत आंध्रला द्विशतकापलीकडे नेले. रिकीने आपल्या रणजी कारकीर्दीतील 14 वे शतक झळकावताना करणसह 190 धावांची अभेद्य भागी रचली. या जोडीने दोन्ही सत्रं खेळून काढली. खेळ थांबला तेव्हा करणही आपल्या तिसऱया रणजी शतकापासून 17 धावा दूर होता.

 बंगालने झारखंडला 173 धावांत गुंडाळले

बंगालने मुकेश कुमार आणि आकाश दीपच्या यांच्या गोलंदाजीच्या जोरावर झारखंडचा पहिला डाव 173 धावांतच गुंडाळला. आघाडीचे सर्व एकेरी धावेतच बाद होत असताना कुमार सतेजने 89 धावांची एकाकी अभेद्य झुंज देत संघाला 173 पर्यंत नेले. झारखंडच्या डावात सहाव्या विकेटसाठी पंकज कुमार (21) केलेली 32 धावांची भागी डावातील सर्वोच्च भागी ठरली. आकाश दीपने 62 धावांत 4 तर मुकेश कुमारने 61 धावांत 3 विकेट्स टिपल्या.

 

संक्षिप्त धावफलक

 उत्तराखंड विरुद्ध कर्नाटक

उत्तराखंड (.डाव)  55.4 षटकांत सर्वबाद 116  (अवनीश सुधा 17, कुणाल चंडेला 31, आदित्य तरे 14, अखिल रावत 14 ; एम. वेंकटेश 14-3-36-5, विद्वत कावेरप्पा 13-6-17-2, कृष्णप्पा गौथम 12.4-3-22-2).

कर्नाटक (. डाव)26 षटकांत बिनबाद 123 (रविकुमार समर्थ खेळत आहे 54, मयांक अगरवाल खेळत आहे 65).

 झारखंड विरुद्ध बंगाल

झारखंड (.डाव)  66.2 षटकांत सर्वबाद 173 (कुमार सूरज ना. 89, पंकज कुमार 21; मुकेश कुमार 21.2-3-61-3, आकाश दीप 21-5-62-4).

 सौराष्ट्र विरुद्ध पंजाब

सौराष्ट्र (.डाव) 87 षटकांत सर्वबाद 303 (स्नेल पटेल 70, विश्वराज जडेजा 28, शेल्डन जॅकसन 18, पार्थ भुत ना. 111, युवराजसिंह दोडिया 22 ; बालतेज सिंह 20.4-6-60-3, सिद्धार्थ कौल 18-2-81-2, मयांक मार्कंडे 29.2-4-84-4) पंजाब (.डाव)एका षटकात बिनबाद 3 (प्रभसिमरन सिंग खेळत आहे 2, नमन धीर खेळत आहे 1).

आंध्र विरुद्ध मध्य प्रदेश

आंध्र (प. डाव)  88 षटकांत 2 बाद 262 (सीआर ज्ञानेश्वर 24, अभिषेक रेड्डी 22, रिकी भुई खेळत आहे 115, करण शिंदे खेळत आहे 83 ; गौरव यादव 17-3-53-2).