
कर्नाटक संघाने पहिल्या दिवशी ८९ षटकांत ५ बाद २५७ धावसंख्येपर्यंत मजल मारली. कर्णधार मयंक अग्रवाल (८०) आणि रविचंद्रन स्मरण (५४) यांनी झुंजार अर्धशतके झळकाविली. मात्र, अनुभवी ऑफ-स्पिनर जलज सक्सेनाने आपल्या फिरकी कौशल्याने कर्नाटकला धक्के देत महाराष्ट्रालाही या लढतीत पुनरागमन करून दिले. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रणजी चषक क्रिकेट स्पर्धेतील ‘ब’ गटातील या सामन्यात पहिल्या दिवशी रोमांचक द्वंद्व रंगविले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अभिनव मनोहर ३१, तर श्रेयस गोपाल ३२ धावांवर खेळत होते.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर शनिवारपासून हा सामना सुरू झाला. मयंक अग्रवालने १८१ चेंडूंवर सात चौकार आणि दोन षटकारांसह ८० धावांची खेळी केली. मात्र, अखेरच्या सत्रात तो सक्सेनाच्या (३/८०) फिरकीला बळी पडला. सकाळी नाणेफेक जिंकून कर्नाटकने फलंदाजी स्वीकारली. मुकेश चौधरीला लय सापडत नसल्याने महाराष्ट्राने लवकरच फिरकीचा वापर केला.
जलज सक्सेनाने पहिल्याच चेंडूवर अनिशला पायचीत केले आणि ६६ धावांची भागीदारी मोडली. श्रीजीतचा (१०) त्रिफळा उडविला. तिसऱ्या षटकात सक्सेनाने के. एल. मग वेगवान गोलंदाज रामकृष्ण घोषने करुण नायरच्या (४) यष्ट्या वाकवल्या. ८९ धावांवर तीन गडी बाद झाल्यावर कर्नाटकचा डाव संकटात सापडला. तेव्हा अग्रवालला आर. स्मरणची साथ मिळाली. चहापानापूर्वी स्मरणने विकी ओस्तवालच्या चेंडूवर अंकित बावणेकडे झेल दिला. चहापानानंतर सक्सेनाने अग्रवालला सौरभ नवाळेकरवी यष्टीचित केले. महाराष्ट्राकडून जलस सक्सेनाने ३, तर विकी ओस्तवाल व रामकृष्ण घोष यांनी १-१ बळी टिपला.



























































